– अशोक पाकलवाड नांदेड


नांदेड शहरातील शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेफिकीर आणि मनमानी कारभारामुळे रुग्ण अक्षरशः हैराण झाले आहेत. ठरलेल्या वेळांचे सर्रास उल्लंघन, उशिरा हजेरी आणि रुग्णसेवेतील ढिसाळपणा यामुळे जनतेतू संताप व्यक्त होत आहे. उपचारासाठी आशेने येणाऱ्या रुग्णांना मात्र निष्काळजीपणाची शिक्षा भोगावी लागत असल्याचे चित्र आहे.
रुग्णालय सकाळी सुरू होण्याची वेळ निश्चित असतानाही अनेकदा डॉक्टर व कर्मचारी उशिरा येत असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. ओपीडीबाहेर तासन्तास रांगा, आतमध्ये शुकशुकाट आणि जबाबदारीची उघडपणे होत असलेली पायमल्ली हा प्रकार आता रोजचाच झाला आहे. “शासकीय सेवा” या नावाखाली चाललेली ही उदासीनता रुग्णांसाठी अपमानास्पद ठरत आहे.
बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांची अवस्था अधिकच दयनीय बनली आहे. प्रवासाचा खर्च, शारीरिक वेदना आणि वेळेची नासाडी सहन करून रुग्णालयात पोहोचलेल्या रुग्णांना उपचाराऐवजी प्रतीक्षेची शिक्षा मिळते. वृद्ध, महिला व गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मूलभूत सुविधांचीही कमतरता जाणवत असल्याने परिस्थिती अधिकच संतापजनक ठरत आहे.
नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “रुग्णालयात वेळेचे पालन होत नसेल, तर ही केवळ निष्काळजीपणा नसून जनतेशी केलेली थेट फसवणूक आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णसेवेच्या नावाखाली सुरू असलेली ही ढिसाळ व्यवस्था तात्काळ सुधारणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे. उपस्थितीवर कडक नियंत्रण, वेळेचे काटेकोर पालन आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्यास जनतेचा रोष रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय यंत्रणेला जाग येणार तरी कधी, हा सवाल आता नांदेडकर ठामपणे विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *