-नांदेड,प्रतिनिधी

वैचारिक दिशा देणारे आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन नांदेड येथे प्रचंड यशस्वी झाले. देशभरातील साहित्यिक, लेखक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांनी या साहित्य संमेलनाची प्रचंड उंची वाढविली.

अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद अराजकीय सामाजिक संघटना आणि विश्व गुरु रविदास समता परिषद सामाजिक प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रांतिकारी बिरसा मुंडा साहित्य नगरी, शिवपार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे आठवे एक दिवसीय गुरु रविदास साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या साहित्य संमेलनाची सुरुवात सकाळी नऊ वाजता ग्रंथ यात्रेने झाली. गुरु रविदास चौक, शेतकरी पुतळा, तरोडा नाका नांदेड येथून या ग्रंथ यात्रेची सुरुवात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सजवण्यात आलेल्या पालखीत गुरु रविदासांची प्रतिमा, भारतीय संविधान आणि महामानवांचे ग्रंथ ठेवण्यात आले होते. वाजत गाजत संमेलन स्थळी या ग्रंथ यात्रेचा समारोप करण्यात आला.

संमेलन स्थळावर समता परिषद ध्वजारोहण अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजीराव जमदाडे यांचे हस्ते करण्यात आले. संमेलनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महामानवांच्या नावाने गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

या साहित्य संमेलनाचा शानदार उद्घाटन सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव लकवाले (उदगीर) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाला. यावेळी सर्व महामानवांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रवीण जेठेवाड यांनी केले.

 

बेगमपूर संकल्पनेवर आधारित संमेलन

हे साहित्य संमेलन गुरु रविदास यांच्या बेगमपूर या संकल्पनेवर आधारित असून ही संकल्पना साकार करायची असेल तर गुरु रविदास यांचा विचार केवळ त्यांच्या जातीपुरता मर्यादित न ठेवता तो वैश्विक स्वरूपात सर्व जाती-धर्माच्या लोकांपर्यंत घेऊन जाणे हाच या साहित्य संमेलनाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन या साहित्य संमेलनाचे मुख्य प्रवर्तक तथा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून केले.

स्वागताध्यक्ष प्रवीण जेठेवाड यांनीही गुरु रविदास यांच्या बेगमपूर संकल्पनेचे सविस्तर विश्लेषण आपल्या भाषणातून केले. ही संकल्पना साकार करायची असेल तर बहुजन समाज मोठ्या प्रमाणात जोडावा लागेल, यासाठी परिवर्तनवादी साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली पाहिजे. आमच्या साहित्यिकांनी काल्पनिक न लिहिता समाजात मिसळून वास्तविक लिखाण केले पाहिजे अशी अपेक्षा प्रवीण जेठेवाड यांनी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *